संस्थेचा इतिहास
१९१७ साली श्रीराम मंदिरातील एका जून्या चाळीच्या खोलीत थोडी पुस्तके जमवून शंकर धनाजी चिरमुले विष्णू धनाजी चिरमुले,वासुदेव गंगाधर ठाकूर व दत्तात्रय श्रीधर तेंडूलकर या तरूणांनी ग्रंथालय चालविण्यास पुढाकार घेतला. तेथून नॅशनल लायब्ररी, वांद्रे या संस्थेचा प्रारंभ झाला व वांद्यांत एक प्रकारचे शैक्षणिक व सांस्कृतिक वातावऱण वाढीस लागले.
१९१८ साली प्रत्येक सभासदाने दोन रूपयाचे पु्स्तक जमा करावे असे त्यांनी ठरविले. ग्रंथ संख्या जोमाने वाढत जात असताना जागा अपुरी पडत गेली. अशावेळी बझार रोड वरील जैन मंदिराच्या मागील बदाम वाडीत ग्रंथालय नेण्यात आले. त्यावेळी नाममात्र वर्गणीत पुस्तके सभासदांना वाचावयास देऊ लागले . १९२५ साली घोडबंदरवरील जागा लायब्ररीच्या वाढीला चांगलीच पोषक ठरली व अनेक नवे कार्यकर्ते संस्थेत आले. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन नगर पालिकेने रू. ५० वार्षिक अनुदान दिले. सोसायटी १९२९ मध्ये रजिस्टर झाली व १९४९ मध्ये संस्थेला तालुका लायब्ररीचा दर्जा दिला गेला. १९५३ साली संस्था पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदविण्यात आली.
वांद्रे नगर पालिकेने भरणी घातलेल्या तलावाच्या जमिनिच्या कडेच्या ८५० चौरस वारांचा भूखंड संस्थेला मिळाला. नामंवत वास्तुरेखा शास्त्रज्ञ मे.पत्की व दादरकर यांनी नॅशनल लायब्ररीच्या इमारतीचे आराखडे तयार केले.
२ नोव्हेंबर १९४८ रोजी तत्कालीन मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांच्या हस्ते इमारतीची पायाभरणी करण्यात आली. व २६ मार्च १९५० रोजी मुंबई इलाख्याचे राज्यपाल राजा महाराज सिंग यांच्या हस्ते लायब्ररीच्या इमारतीचे उद्घाटन झाले, या घटनेचे महत्व नगरपालिकेने जाणले व इमारतीच्या बाजूने भोईवाड्यातून वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाणा-या रस्त्याला नॅशनल लायब्ररी,वांद्रे रोड असे नाव दिले.
नॅशनल लायब्ररी, वांद्रे ची म्हाडा मधील वांद्रे पूर्व शाखा
वांद्रे पूर्व भागातील नागरिकांच्या व ग्रंथप्रेमी वाचकांच्या मागणीनुसार संस्थेची शाखा सुरू करावी म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट गृहनिर्माण भवनाचे त्यावेळेचे अध्यक्ष कै.पु.ग.खेर यांच्या सहकार्यामुळे वांद्रे पूर्व विभागांत गृहनिर्माण भवनाच्या जागेत संस्थेची शाखा सुरू करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन दि. 15 ऑगस्ट 1975 रोजी करण्यात आले. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी माननीय कै.पु.ग.खेर होते तसेच पद्मश्री अनंत काणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
इमारत बांधणीला रा.कृ.पाटकर व श्रीमती बाळीबाई राव यांच्या कुटुंबिनांयी संस्थेला भरघोस असा आर्थिक मदतीचा हातभार दिला. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ इमारतीतील तळमजल्याच्या सभागृहाला कै. रा.कृ.पाटकर सभागृह तर पहिल्या मजल्याला कै.गणपतराव व कै.नारायण राव सभागृह असे नाव देण्यात आले. सन १९५८-१९५९ मध्ये ग्रंथसंख्या वाढत असल्यामुळे हिंदी व गुजराती विभाग दुस-या मजल्यावर हलविण्यात आला. तेव्हा महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री असलेले आपल्या संस्थेचे हितसंबंधी व वांद्रयातील नागरिक प्रा,सदानंद वर्दे यांनी, ग्रंथालय ही शैक्षणिक संस्था आहे असे प्रमाणपत्र दिल्यामुळे तेव्हाचे नगरविकास मंत्री श्री.हशु आडवाणी यांनी आपल्या संस्थेला चटई क्षेत्रफळ निर्देशांक मंजूर केला त्यामुळे दुस-या मजल्या वरील पत्र्याचे छप्पर काढून तिसरा मजला उभारणे व गच्ची करून संपूर्ण आवारमध्ये फरशी बसवणे अशा पध्दतीने १९८१ पर्यत इमारतीचा विस्तार करण्यात आला.
आतापर्यंत संस्थेने रजत, सुवर्ण महोत्सव साजरे केलेले आहेत. सन १९९२ मध्ये संस्थेने आपला अमृत महोत्सव साजरा केला.
(वास्तुनिर्मिती सुवर्ण महोत्सवा निमित्ताने संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना हिंदु हदय सम्राट मा. शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे व ज्योर्तिभास्कर श्री. साळगावकर व संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी)
दि.२५.३.२००० रोजी वास्तुनिर्मिती सुवर्णजयंती महोत्सवाचे दिप प्रज्वलन करून उद् घाटन करताना हिंदू हदयसम्राट मा. शिवसेना प्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे.
दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट ग्रंथालयासाठी देण्यात येणारा डॅाँ .बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ही याच कालावधीत प्राप्त झाला. व मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा अ ग्रंथालय म्हणून शासकीय मान्यता मिळाली. हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
(डॉ. आंबेडकर पुरस्कार १९९२ वितरण प्रसंगी व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष श्री.मधुसूदन मोरे डॉ.आंबेडकर पुरस्कार स्वीकारताना)
अफाट ग्रंथसंग्रह
नॅशनल लायब्ररी वांद्रे (प.), गृहनिर्माण भवन मधील वांद्रे (पूर्व) शाखा, किशोर विभाग या सगळयांची चार भाषांची मिळून ग्रंथसंख्या दिड लाखापेक्षा जास्त आहे.
सातत्याने वाढणा-या ग्रंथ संख्येमुळे संस्थेमध्ये जागा अपुरी पडू लागली होती कमीत कमी जागेमध्ये जास्त पुस्तके ठेवता येतील यासाठी कार्यकारी मंडळाने सन 2010 मध्ये आधुनिक पध्दतीच्या फोल्डिंग रॅक्स (सरकत्या घडवंच्या) घेण्याचे ठरविले.
संस्थेत घेण्यात आलेल्या आधुनिक पध्दतीच्या (फोल्डींग रॅक्स) सरकत्या घडवंच्या
वयोवृध्द सभासदांना संस्थेमध्ये जिने चढउतार करताना त्रास होऊ नये यासाठी दि ६ मे २०११ रोजी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री जगन्नाथ महाजन यांच्या हस्ते उद्वाहनाचे उद्घाटन करण्यात आले.
कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. ग्रंथ संख्या वाढली पण अनेक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम वाढले. याची वेळीच नोंद घेऊन संस्थेत दोन संगणक घेतले तसेच पुस्तकांची माहिती उपलब्ध करण्यासाठी अक्षरमायाचे सॉफ्टवेअर घेतले, ग्रंथालयातील सेवकांना त्या संगणक प्रणालीचे प्रशिक्षण देऊन पुस्तकांची माहिती/तपशील संगणकामध्ये नोंद करण्यास सुरूवात झाली. सन २००९ मध्ये राजा राममोहन रॉय यांच्याकडून २ संगणक, १ झेरॉक्स मशीन, १ प्रिंटर तसेच साधन सामुग्री अनुदान ग्रंथालय संचलनालय यांच्याकडून ४ संगणक १ प्रिंटर, तसेच खासदार मा.श्री मनोहर जोशी यांच्या खासदार निधीतून दोन संगणक, २ डॉट मॅट्रिक प्रिंटर, प्राप्त झाले. ग्रंथालय अद्यावत करण्याच्या दृष्टिने संस्थेने सध्या प्रचलित असलेली संगणक प्रणाली घेण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला . संगणक प्रणाली मध्ये पुस्तकांची माहिती भरण्याचे व जतन करण्याचे काम हे चालूच होते. प्रथम जमा-खर्चासह संस्थेचे आर्थिक व्यवहारचे संगणककिरण करण्यात आले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुस्तकांची बार कोड पध्दत सुरू केली, व येथून नॅशनल लायब्ररीच्या आधुनिकिरणाची वाटचाल सुरू झाली.
(ख्यातनाम लेखक, संपादक, मा.श्रीकांत बोजेवार (तंबी दुराई) यांच्या शुभहस्ते नॅशनल लायब्ररी, वांद्रे मुंबई संगणकीकृत ग्रंथालयाचे उदघाटन करताना.)
संपूर्ण पुस्तकांची माहिती तसेच सभासदांची माहिती अद्यावत केल्यानंतर शनिवार दि. १४ एप्रिल २०१२ रोजी ग्रंथालयाचे संगणकीकृत देवाणघेवाण प्रक्रियेचे उद्घाटन सुप्रसिध्द पत्रकार व लेखक श्री श्रीकांत बोजेवार (तंबी दुराई) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. दि .९ फेब्रुवारी २०१४ रोजी ग्रंथालयाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन प्रसिध्द लेखक श्री शिरीष कणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्कृष्ट संदर्भ विभाग
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, किशोर , मासिकांचा विभाग चालविला जातो. संदर्भ विभागातील पुस्तकांखेरीज इतर पुस्तके घरी वाचनास दिली जातात. संदर्भ विभाग इतिहास, साहित्य सूची, कोष इत्यादी विषयांची तीन हजारांहून अधिक पुस्तके आहेत. 1926 चा महाराष्ट्र ज्ञानकोष, महात्मा गांधी वाड्मयाचे 23 खंड, समग्र केळकर ग्रंथवाड्मयाचे अनेक खंड वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले जातात. भारतीय संस्कृती कोष 1889, 1956 चा द.मा.मराठे यांचा जगाचा इतिहास, 1946 चा मराठी व्युत्पत्ती कोष, 1932 सिध्देश्वर शास्त्री चित्राव यांचा भारतवर्षीय प्राचीन कोश, रा.गो.कानडे यांचा मराठी नियतकालिकांचा इतिहास(1832 ते 1937), व्यवहारिक ज्ञानकोश भाग 2 ते 3 ग.रा.भिडे(1938) सार्थक वाड्मय सन 1878 लेखक गणेश व्य.गर्दे.,1919 श्रीधर व केतकर यांचा महाराष्ट्र वाड्मय सूची, 1931 विष्णु जोगमहाराज सार्थ श्रीतुकारामाची गाथा, अशा विविध प्रकारचे जुने ग्रंथ संशोधक व जिज्ञासूसांठी उपलब्ध आहेत. त्याचे संपूर्ण खंड येथे पहावयास मिळतात. 1951 पूर्वी प्रसिध्द झालेल्या मराठी, गुजराथी पुस्तकांच्या 33 (मायक्रोफिल्म) सूक्ष्म फितींची भर पडली आहे.
Diseases of the nose, throat and ear (1934), Logan tumera, Our mutual friend(1891), Charles Dickens, The nigger of the narcissuis (1925), Joseph Conrad, Compelet works of William Shakespeare या साहित्याचे संपूर्ण खंड पहावयास मिळतील व इतर कथा कादंबरी दुर्मिळ ग्रंथाची संपदा ग्रंथालयात उपलब्ध आहे, ही संशोधकांना पर्वणीच आहे.
संस्थेचे सांस्कृतिक कार्य
संस्था प्रतिवर्षी विजया दशमीच्या निमित्ताने शारदोत्सव हा एक महत्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडते. 1988 पर्यंत थोर साहित्यिक वा सामाजिक विचारवंताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात येत असे.
नॅशनल लायब्ररी दरवर्षी सरस्वतीबाई खेर व्याख्यानमाला भरविते. आतापर्यंत साहित्यिक कृ.प्र.सेतु, माधवराव पगडी, वि.स.पागे, विं.दा.करंदीकर, पु.ल.देशपांडे, म.वा.धोंड, अनंत काणेकर, य.दी.फडके, डॉ.अरूण टिकेकर, श्री.ब.ना.जोग, डॉ.बा.श.जावडेकर, श्रीज्ञानराज सचिव संस्थान माणिकनगर आदि मान्यवरांनी येथे व्याख्याने दिली आहेत.
महत्वाची बाब म्हणजे सेतु माधवराव पगडी व य.दि.फडके हयांच्या व्य़ाख्यानांची पुस्तके संस्थेने प्रकाशक म्हणून प्रसिध्द ही केली आहेत.
१९७५ साली वास्तुप्रवेश रौप्य महोत्सव प्रीत्यर्थ श्री. पु.ल.देशपांडे यांचे व्याख्यान
शतकोत्सव 2016-2017
वाचक चळवळ अधिक वृध्दिंगत करण्याचा कार्यकारी मंडळाचा मानस असून त्या अनुषंगाने शतकोत्सव निमित्त काही योजना अमलांत आणल्या.
संस्थेच्या 2016-2017 या शताब्दी वर्षानिमित्त घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा सर्वासाठी खुली होती त्यामुळे स्पर्धेला उत्स्फुर्ते प्रतिसाद मिळाला.
दि. 27 फेब्रुवारी 2016 रोजी प्रसिध्द लेखिका ललिता ताम्हाणे यांच्या हस्ते संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. शिक्षण कोणत्याही भाषेत घेतले तरी आपआपल्या घरी दारी मराठीतच बोला असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमात संस्थेच्या घोषवाक्य स्पर्धेचा निकाल ताम्हणे यांनी जाहीर केला.
(सुप्रसिध्द लेखिका ललिता ताम्हणे यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले त्याचे छायाचित्र )
(वसंत वलय निर्मित मानवंदना हा कार्यक्रम सादर केला त्यावेळी रंगभूमीवरील प्रदिप पटवर्धन, विजय गोखले, विघ्नेश जोशी, मयुर सुकाळे, कल्याणी जोशी आदी मान्यवरांची छायाचित्र
शताब्दी वर्षानिमित्त ग्रंथालयात सभासदांसाठी राबवण्यात आलेले कार्यक्रम
ग्रंथदिंडी
मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शतक महोत्सवाचा शुभारंभ प्रसिध्द नाटयकर्मी व नाटय संमेलना अध्यक्ष श्री.गंगाराम गवाणकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथदिंडीने करण्यात आला. या ग्रंथदिंडीत शाळकरी मुले, वांद्रयातील रहिवासी मोठया संख्येने सामील झाले होते. याप्रसंगी चेंबूरच्या नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या विद्यार्थीनीनी लेझीमचे प्रात्यक्षिक केले.
अंकिकरण उद्घाटन
(डिजीटायझेशनचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.श्री. सी विदयासागरजी राव आले असता त्यांचा सन्मान करतानाचे छायाचित्र)
संस्थेने शतकोत्सवानिमित्त संस्थेकडील दुर्मिळ व इतर ग्रंथ संपदेचे डिजिटायझेशनचे महत्वाकांक्षी कार्य हाती घेतले असून या कार्याचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.श्री.सी.विद्यासागरजी राव यांच्या हस्ते दि.9 एप्रिल 2016 रोजी करण्यात आला. डिजिटल स्वरूपातील एक पुस्तक एकाच वेळी अनेक जण वाचू शकतात. त्यामुळे डिजिटायझेशनद्वारे ज्ञान व माहितीचे सार्वत्रिकीकरण होऊन पुस्तके सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असे विचार मा.श्री.विद्यासागरजी राव यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचा शंभर वर्षाचा इतिहास माहितीपटाद्वारे वाचकांसमोर मांडण्यात आला.
व्याख्यानमाला
दि.28,29 एप्रिल व 1 मे 2016 रोजी विविध विषयांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संगणक तज्ञ व साहित्यिक श्री.अच्युत गोडबोले यांनी माझा लेखन प्रवास या विषयावर, तर नामवंत मुलाखतकार श्री.सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांना भेटलेल्या व्यक्तींचे किस्से व त्यांनी घेतलेल्या मुलाखती तसेच अर्थतज्ञ राजीव साने यांनी आर्थिक विकासाची आवश्यकता आणि त्यातील अडथळे या विषयावर व्याख्याने दिली.
मंगळागौर
श्रावण महिन्यात दि.6 ऑगस्ट 2016 महिलांकरीता मंगळागौर हा पारंपारिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. आपल्या पारंपारिक खेळांची व संस्कृतीची नवीन पिढीला ओळख व्हावी ही परंपरा पुढे चालावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला असून संस्कृती रंग महिमा समुहातर्फे साजरा करण्यात आला.
(मंगळागौर हा पारंपारिक कार्यक्रम करतानाचे छायाचित्र)
हास्यकवि संमेलन
(हास्य कवि संमेलन)
दि. 15 ऑक्टोंबर 2016 रोजी कोजागिरी पोर्णिमेनिमित्त संस्थेत हास्य कवि संम्मेलन आयोजित केले होते. मान्यवर कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, अरूण म्हात्रे, डॉ.महेश केळुसकर या नामवंत कवींनी भाग घेऊन आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांना चिमटे काढत हसवले या कवितांमध्ये प्रेमकविता यावेळी सादर करण्यात आल्या.
याच दिवशी सकाळच्या सत्रात दिवंगत राष्ट्रपती कै.अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी सुप्रसिध्द बाल साहित्यिक श्री.एकनाथ आव्हाड यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दि.22 डिसेंबर 2016 रोजी प्रसिध्द नगरचनाकार श्री.चंद्रशेखर प्रभू यांचे मुंबई उपनगरांचा पुनर्विकास, 23 डिसेंबर 2016 रोजी ज्येष्ठ पत्रकार व अर्थतज्ञ श्री. हेमंत देसाई यांचे चलनाचे अर्थकारण व राजकारण व 24 डिसेंबर 2016 रोजी सौ.धनश्री लेले यांचे रामदास स्वामींच्या दासबोधातील सौदर्य स्थळे अशा विविध विषयांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
दि. 21 जानेवारी 2017 रोजी श्री.प्रवीण दवणे यांच्या अनुभवातून लेखन प्रवास कसा सुरू झाला असे त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सांगितले. तसेच श्री अशोक समेळ यांनी अश्वत्थामा या महाभारतातील व्यक्तीरेखेवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती
माणिकायन
दि.18 फेब्रुवारी 2017 सायंकाळी 6 वाजता प.पू.श्री.ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या विशेष उपस्थितीत संत परंपरा, श्रध्दा साहित्य व संगीत वारसा सांगणारा कार्यक्रम गीत मणिकायन हा साजरा करण्यात आला. तसेच 27 फेब्रुवारी 2017 रोजी मराठी भाषा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन व श्री चंद्रशेखर सामंत यांचा नटसम्राट, जाणता राजा, वस्त्रहरण या नाटकातील विविध नाटयछटा तसेच लोकसंगीत व भावगीतांवर आधारीत साहित्य संध्याकाळ हा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सादर केला गेला.
2016-2017 मधील नॅशनल लायब्ररीने आयोजलेल्या या भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांनी उपनगर वांद्रे गजबजून गेले दूरदूरच्या साहित्यिकांनी,कवींनी,विचावन्तांनी , अर्थतज्ञांनी इथे पायधूळ झाडली.
गेल्या शतकभरातील समाजजीवनातील मोठया बदलाची साक्षीदार आणि ते बदल पचवून काळाबरोबर बदलत वाढत गेलेली अशी नॅशनल लायब्ररीची इमारत आजही ज्ञानयज्ञात मग्न आहे.
सर्व सुखसोयीनी उपयुक्त व तमसो मा योतिर्गमय हे ब्रीद वाक्य घेऊन गेली शंभर वर्षे वाचकांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे कार्ये ही संस्था अविरतपणे करीत आहे..
विविध संस्थाना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन संयुक्त विद्यमाने शताब्दी वर्षात केलेले काही कार्यक्रम
दि.17 जुलै 2016 रोजी आषाढ महिन्यातील “रसवर्षा” हा पावसाळी कविसंमेलनाचा कार्यक्रम कवियित्री सुनंदा भोसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यात प्रसिध्द कवि प्रसाद कुलकर्णी, संगिता अरबुने, अनुराधा नेरूरकर, सौ ज्योती कपिले, सौ.भारती डिग्गीकर, सतीश सोळांकुरकर, डॉ.गजानन मिटके, नितीन तेंडुलकर या नामवंत कवींनी भाग घेतला होता.
दि. 22 जानेवारी 2017 रोजी पाणिनी मासिक व जे.के.मिडिया, नॅशनल लायब्ररी यांच्या सयुक्त विद्यमानाने पहिले आंतरभारतीय साहित्य सेतू संमेलन भरविण्यात आले. या संम्मेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द पत्रकार व लेखक संजय आवटे होते. कार्यक्रमास संपदा कुलकर्णी, पाणिनी मासिकाच्या संपादिका संगीता चव्हाण, ज्योती कपिले उपस्थित होत्या. संमेलनाच्या दुस-या सत्रात एकनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली कथा मैफलीत मेघा जावडेकर, अजंली गोडबोले, हर्षदा मोरे, गीता पाटील, यांनी खुमासदार कथा सादर केल्या अनुवादातील सौंदर्यस्थळे या चर्चासत्रात मृणालिनी गडकरी चन्नवीरमठ आणि भारती बिर्जे-डिग्गीकर यांनी भाग घेतला. संध्याकाळी अनुराधा नेरूरकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले.
दिवाळी पहाट
सभासदांनाच नव्हे तर परिसरातील इतर रसिकांसाठी दि.5 नोव्हेंबर 2010 रोजी सुप्रसिध्द गायिका सौ.कविता गाडगीळ यांचा सुश्राव्य गायनाचा दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व या कार्यक्रमास उत्सुर्फ प्रतिसाद मिळाल्यावर दरवर्षी दिवाळी पहाट हा कार्यक्रम दिवाळीच्या पहिल्या दिवशी करण्याची प्रथा सुरू झाली.
संस्थेमधील पहिला दिवाळी पहाट दि. 5 नोव्हेंबर 2010 रोजी साजरा करण्यात आला.
दि.29 ऑक्टोंबर 2016 रोजी वांद्यातील रहिवासी व आपल्या कलागुणांनी नावारूपास आलेल्या अशा सुप्रसिध्द गायिका संजीवनी भेलांडे, सौमित्र, मिलींद इंगळे, श्रीला तांबे, व्हायोलिन वादक महेश खानोलकर व तबलावादक अविनाश आहेर या सर्व कलाकारांना एकत्रित आणुन शब्द शतकांचे नाते सुरांचे हा कार्यक्रम दिवाळी पहाट म्हणून रंगशारदा नाटय मंदिरात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास रसिंकानी भरभरून प्रतिसाद दिला व कार्यक्रम अविस्मरणीय झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. या कार्यक्रमासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि भाजप आमदार श्री आशिष शेलार यांची खास उपस्थिती होती. श्री प्रभूंनी आपल्या शालेय जीवनातील प्रसंगाना उजाळा दिला व वांद्रेकर असल्याचा अभिमान व्यक्त केला.
दिपगंध
दि.12 नोव्हेंबर 2023 चा दिवाळी पहाट दिपगंध हा कार्यक्रम बालगंधर्व येथे सादर केला. सदर कार्यक्रमाचे गायक सारेगम फेमचे श्री मंगेश बोरगावकर, गायिका सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाधील शरयू दाते होते
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेने अभ्यासिका विभागत आपआपल्या कार्यक्षेत्रात उत्तमरित्या पास होऊन गेलेल्या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले
किशोर विभाग
लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने पहिल्या मजल्यावर विविध प्रकारची मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तके किशोर विभागात लहान मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. तसेच किशोर सभासद शाळेमधून दिलेले प्रोजेक्ट संबंधीची पुस्तके सहज संस्थेत येऊन लिहून अथवा झेरॉक्स काढून सादर करतात. लहान मुलांचा एक उपक्रम म्हणून सन 2012 पासून नृत्य कार्यशाळा सुरू केली. सभागृहामध्ये माफक दरात लहान मुलांसाठी भरतनाटय नृत्याचे वर्ग सुरू केले होते. वेगवेगळया शाळांतील गरजू व गरीब मुलांना शैक्षणित साहित्यासाठी नॅशनल लायब्ररी शैक्षणिक निधीतर्फे मदत करते.
भरतनाटय नृत्य करताना
बालमहोत्सव
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेमध्ये 12 व 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या निमित्ताने बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात चित्रकला, निबंध, वेशभूषा, रांगोळी, आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी साहित्यिक डॉ.विजया वाड उपस्थित होत्या . त्यांनी मुलांना कथा व कविता म्हणून दाखवल्या.




(दि.12 ते 14 नोव्हेबर मध्ये बालमहोत्सव साजरा केला जातो त्यामधील रांगोळी, नृत्य ,चित्रकला व निबंध स्पर्धा सूरू असतानाचे छायाचित्र)
बालकट्टा
लहान मुलांना त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मुले मोबाईलपासून दूर रहावेत त्यांचा आत्मविश्वास वाढावा याकरता बालकट्टा संस्थेमध्ये आयोजित करण्यास सुरूवात झाली. याची सुरूवात दि. 13 एप्रिल 2019 रोजी ते 22 एप्रिल 2019 पर्यंत सर्वात प्रथम सात दिवसाची बालकट्टा आयोजित करण्यात आला होता या सात दिवसांमध्ये डॉ.मधुमंजिरी गटणे यांनी गोष्टी वाचून दाखविल्या. निरंजन शहा यांनी मुलांकडून ओरिगामीचा मासा आणि हदय तयार करून घेतले आणि ओरिगामीमुळे मुलांचे मन एकाग्र होण्यास मदत होते हे सांगितले. तर नेपथ्यकर संतोष जढाळ यांनी मुलांना नाटकाचे तंत्र आणि मंत्र समजावून सांगून मुलांना नाटकाची ओळख करून दिली. तर नवोदित अभिनेत्री, सूत्रसंचालक, पत्रकार ज्ञानेश्र्वरी वेलणकर हिने बालकट्टाच्या मुलांसाठी नौटंकी हे सेशन घेऊन प्रत्येक मुलाच्या अभिव्यक्तीला वाव दिला. त्या मुलांना बोलते करून मेडीटेशन तसेच ओमकांराचे महत्व समजावून सांगितले. लिटिल शेफमध्ये शेफ तुषार प्रीती देशमुख यांनी मुलांना आवडते सॅंडविच कॉर्न भेळ शिकवली. तसेच मुलांना जवळील बँकेत नेऊन तेथील व्यवहाराबद्दल चालणारे कामकाजाबद्दल महिती देण्यात आली. मुलांना पोस्ट ऑफीस मध्ये सुध्दा नेऊन तेथील माहिती देण्यात आली.




विनामूल्य बालकट्टा संस्थेत सुरू करण्यात आला. हा बालकट्टा महिन्यातून एकदा राबविला जात असे यामध्ये मुलांना जादूचे खेळ करून तसेच विविध पुस्तकातील गोष्टी सांगितल्या जातात तसेच कविता वाचन केले जात असे. तसेच बालकट्टयातील मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि याच बालवाचकामधून उदयाचे सुजाण वाचक निर्माण होतील या संकल्पनेतून मुलांना विनामुल्य सभासदत्व देऊन पुस्तक वाचण्यासाठी दिले असे.
अभ्यासिका
हुशार व होतकरू शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासासाठी निवांत जागा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने संस्थेतील तिस-या मजल्यावर वातानुकूलीत अशी अद्यावत अभ्यासिका उपलब्ध करण्यात आली असून विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी वेगळी आसन व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. महिना नाममात्र रू. 500/- (18% GST) प्रवेश फी रू.25/- व अनामत 600/- असे एकूण रू. 1215/- भरून सभासद होऊ शकतात. एकूण 200 च्या वर अभ्यासिका सभासद असून सकाळी 8 ते रात्रौ 10.00 या कालावधीसाठी अभ्यासिका उघडी असते. रविवार देखील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात.
संस्थेचा उपक्रम फिरते ग्रंथालय
वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी पुस्तके थेट वाचकांपर्यत पोहचविण्यासाठी फिरते ग्रंथालय हा उपक्रम नॅशनल लायब्ररी वांद्रे मधून सुरू झाला. बुधवार दि.17 जुलै 2019 रोजी हया ग्रंथालयाचे उद्घाटन श्री.मिलिंद गुणाजी हयांच्या शुभहस्ते होऊन आमदार श्री.आशिषजी शेलार हयांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. हया उद्घाटन सोहळ्यात शासनाचे माननीय अधिकारी वर्ग सौ. शालिनी इंगोले, श्री संजय बनसोड, श्री.संदिप भोसले उपस्थित होते
फिरते ग्रंथालय मध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी , गुजराथी अशी चार भाषांची पुस्तक असून कथा, कादंब-या, प्रवास वर्णन, चरित्र अशा विविध विषयानुसार पुस्तक आहेत. फिरते ग्रंथालय मध्ये किशोर विभागातील मुलांसाठी ही पुस्तके आहेत. फिरते ग्रंथालयात साधारण सभासद फी रू.100/- व अनामत रू.500/- भरून सभासद होता येते तसेच किशोर विभागातील मुलांसाठी रू.50/- व अनामत 200/- अशी वर्गणी भरून फिरते ग्रंथालयाचे सभासदत्व घेता येते. फिरते ग्रंथालयाचे आतापर्यत एकूण साधारण सभासद 150 आहेत व किशोर सभासद एकूण 125 आहेत. मासिकांसाठी सभासदत्व रू. 100/- अनामत व मासिक वर्गणी रू.50/- भरून सभासदत्व घेता येते. दिवाळी निमित्त दिवाळी अंक योजना फिरते ग्रंथालयात राबविली जाते.
फिरते ग्रंथालय मध्ये एकूण 2500 ते 3000 पुस्तके आहेत. त्याव्यतिरिक्त सभासदांना हवे असलेले पुस्तक सभासद मोबाईल व्हाटसअप सवांद साधून मागवून घेऊ शकतो.
स्वाक्षरी संग्रह
विविध नामवंत लेखकांच्या स्वाक्ष-या असलेल्या अनेक ग्रंथांचे येथे खास जतन करण्यात आले आहे. प्रा.पु.भा.भावे, प्रा.अनंत काणेकर, यशवंतराव चव्हाण, पु.ल.देशपांडे, वसंतराव नाईक, शंतनुराव किर्लोस्कर, व्यंकटेश माडगूळकर, श्री.ना.पेंडसे, माधवराव बागले, जयवंत दळवी, रा.श.वाळिंबे, रामदास भटकळ, अमृतलाल याज्ञिक, आदी मान्यवरांच्या स्वाक्ष-या असलेली पुस्तके या लायब्ररीमध्ये पहावयास मिळतात.











